मित्रा
मित्रा
माझ्या सवे सुखाने, जगशील काय मित्रा?
माझाच हात हाती, धरशील काय मित्रा?
स्वार्थी जगात साऱ्या, नाही कुणी कुणाचा
जगण्यास तू मजेने, शिकशील काय मित्रा?
बघ कोवळ्या फुलांचा, दिसतोय साज सुंदर
सोडू नकोस आशा, हसशील काय मित्रा?
नाही कधीच हरला, तू कोणत्या भयाने
त्वेषात तू नव्याने, लढशील काय मित्रा?
आहोत मित्र आपण, बघ भांडतो जगाशी
माझ्याच सोबतीने, असशील काय मित्रा?
आहेत बोल खोटे, नादान बांधवांचे
असतो बनाव मोठा, बघशील काय मित्रा?
आता कधी न व्हावी, बघ यातना मनाला
निर्धार खास आता, करशील काय मित्रा?

Comments
Post a Comment